Wednesday, 22 July 2020

श्रावणी

घाट ओला पाहताना,चिंब ओले भाव होई
अन सरी या श्रावणी च्या,अंतरीचा ठाव घेई

हा कड्याचा थंड वारा, गीत वेडावून गाई
इंद्र धनु ही सप्तरंगी, अंबरा फुलवून जाई

सोडवेना घाट पाणी, सरसरूनी येत आहे
धबधब्याचे आर्त रडणे, विरह भावे चालताहे

धावते ओढे जसे हे ,शुभ्र मोती गुंफलेले 
हे ढगांचे रूप जणु की, द्रव्य रूपी वाहिलेले

मलमली या हिरवळी चा ,शालू वाटे पसरलेला
दूर त्या क्षितिजांतरी की, पाचु कोणी विखुरलेला

सोनकी चे स्वर्ण उधळी, सह्य नटुनी श्रावणी या
कारवी जणु माणिकाचे, रत्न शोभे कोंदणी त्या

यौवनी स्त्री साजते तद्, श्रावणी हा सह्य शोभे
आस आम्हा डोंगराची ,का उगाची नित्य लागे ?
baaji©

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...