शिवरायांचे शिष्य मराठे कावा आपले अस्त्र
मरुतावरती स्वार मराठी वेग आपले शस्त्र
आज हवे तर पृथ्वी स्वामीच्या चरणी आणून मांडू
दिशा दाखवा निजाम काय तो इंद्राशी ही भांडू
आदेश द्याल तर रक्तहीनसा विजय करुन येऊ
राऊ वदले "महाराज पालखेडी निजाम गाडून येऊ ? "
घोडा आपले शिबिर समजा हुरडा आपला पेढा
राती नसती झोपण्यास संधीच ती गनिम वेढा
मर्हाटभाई करु चढाई एक होऊनी जिंकू लढाई
खेचून आणू दिल्लीपती ला शाहू छत्रपती पायी
दिल्लीपती ची रणशिंगाने झोप उडवूनी येऊ
राऊ वदले "चला मल्हारराव दिल्ली जिंकूनी येऊ" !
छत्रपतींचे स्वप्न केशरी झोपू देईना काही
सोडवायची काशी मथुरा यमुना गंगामाई
इंग्रज हबशी पोर्तुगीजाची उडवू राई राई
हिंदू पद पातशाहीला उशीर आता नाही
पोर्तुगीजांना रणयज्ञाचे चटके देऊन येऊ
राऊ वदले अप्पा वसई भगवी करुनी येऊ
बाजी©