शौर्य धैर्य अन भक्तीचा ,अखंड अमृत ओढा
मराठीचे हृदय विहंगम ,आपला मराठवाडा
बीड जालना हिंगोली लातुर अन परभणी
नांदेड धाराशिव आहे औरंगाबाद राजधानी
सहस्त्रकुंड सौताडा शैवभूमी कपिलधार प्रपात
गौताळा रामलिंग नायगाव माहुरचे अरण्य घनदाट
गोदावरी माय मांजरा,बिंदुसरा इथे वाहती
पुर्णा पैनगंगा सिंदफणा,मराठवाडा फुलविती
तूर मुग उडीद मटक्यांनी टाच कणग्या भरती
तीळ ,मोहरी, कार्हळे ,जवसाची पिके डोलती
काळ्या मातीची सुपीकता आम्ही वर्णावी किती
गहु बाजरी ज्वारी रुपाने पिकतात इथे मोती
दुष्काळाने हतबल होतो लढणे सोडत नाही
मातीची या साथ आम्हाला कधी सोडवत नाही
सातवाहन पराक्रमी ,राष्ट्रकुटांचे मुळ
यादवांची देवनगरी, इथलेच भोसले कुळ
चालुक्यीय कंधार मोठा उदगीर परांडा विकट
रमणीय नळदुर्ग मोठा भयंकर धारुर कोट
वसई भांगसी अंतुर आणी सुतांडा उपकोट
मध्य भागी राजधानी उभा देवगिरी चखोट
शिवशंकराचे स्थान येथे परळी वेरुळ औंढा
श्री रेणूका ,तुळजाई कुलदैवी सकलाची अंबा
श्रीगुरु सचखंड तख्त महद्तीर्थ शिखांचे
कचनेर जटवाडा कुंथलगिरी तीर्थ पवित्र जैनांचे
इथेच अवतरला कृष्ण ज्ञानेश्वरांच्या रुपाने
नाथा घरी वाहीले पाणी भगवान श्रीखंड्याने
महद्भक्त नामदेवा हातचा घास खाई पांडुरंग
रामदास समर्थ कलीयुगीचा अवतार हनुमंत
विविधतेत एकतेला येथे वेरुळास कोरले
शांतीरुप अजिंठा लेणे मराठवाड्यात घडले
दख्खनी ताज उभा येथे, हेमाडपंती मंदिरे खास
चैत्य विहारांची नांदी जणु विश्वकर्म्याचा निवास
हाल राजाची सप्तशती महाराष्ट्रीचा आद्यग्रंथ
मुकूंदाच्या विवेकसिंधूत वाहतो मराठी गंध
पैठणीचा दिमाख भारी अजून जगी साजतो
शाही हिमरु शालू इथला सर्वानाच भावतो
भाजी भाकरी प्रिय सोबती कांदा ठेचा थोडा
भाषेने तिखट बोलीने गोड आपला मराठवाडा
बाजी©
No comments:
Post a Comment