Saturday 18 April 2020

सवाल जवाब

बघतीस का लपवुनी भावना,
सखये बोल जराशी ,
लटके भांडण करुनी अशी,
पाठमोरी  बैसशी 
रागे भरलेल्या तव वदनी,
खुलून खळी उमटावी
वदन पाहता तव मनरमणी ,
हृदय'तरी' झुलावी
जणु एकट्या गर्दरानी हळुवार ,
झुळुक चलावी
स्पर्शुनी मग तनास तुझीया ,
शिरशिरी मनात उठावी
गर्दछायेच्या सापटीतून,
किरणे ती डोकावी
अन किरणांशी खेळत कुंतल ,
विजेरीसम चमकावी 
पसरले भुवरी गालीचे,
तृण स्पर्शुदे अंगाशी
होउ दे भावना एक ह्या,
आपुली प्रीत बहरावी
आसवमृग रोधुनी धर हा,
विरह आता संपला
बहुकष्टाने बहुवर्षाने ,
प्रेममळा राखला
हृदय का पाकळी जाहले,
स्मित तव पाहता
परतुनी आलो तुझ्याकरिता ,
आता जीव थकला
परि,
प्रेयसी होती ती ही मोठी,
सुंदर मनरमणी
सीमेवरची माझी लाडकी,
सवत तुझी संगिणी
माहीत होती तुजला आधीच,
माझी प्रेमकहाणी
बसलीस का मग स्वागत वेळी,
पाठ अशी फिरवुनी

#बाजी©
लपविता लपविणे भावना
जमते का रे राया
वाटेवरती हात सोडूनी
जमते का वाट पहाया
रुसले नाही तुझ्यावरी मी
स्वप्न सख्या रे भासे 
भास असे तुझ्या भेटीचे
नेहमी होती खासे
प्राण पाखरु वेडे माझे 
तुजकडे भरारी घेत
शवा सोडूनी जीवा करीता
झुरत राहते नित्य
वाटेवर त्या ऋतू लोटती
नजर अशी ना हलते
परतीच्या आशेवरी तुझिया
दिवस कसे मी जगते
डोळ्यात आसवे घेऊन भिजते
नशिबाचे हे देणे
कर्तव्याचे वाण लुटणे 
वीरपत्नीचे लेणे
असा सजूनी असतो नेहमी
साज तुझ्यासाठी
ताटात वेगळा असतो नेहमी
घास तुझ्यासाठी
बरे तरी शिशिरा मागूनी
वसंत नेहमी येतो
तुझ्या पाऊली मनात माझ्या
बहर फुलवूनी जातो




baaji

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...