Saturday, 28 December 2019
रणरागिणी
शत्रुस मारुनी दहा दिशास
Thursday, 24 October 2019
दैव भाग आहे
गालगागा गालगागा गालगाल गागा
का मनी या मत्सराची सुप्त आग आहे
जे मिळाले ना मला तो दैव भाग आहे
या अपेक्षा तु कशाला ठेवतोस वेड्या
त्रास मोठा हा जिवाला प्रेम रोग आहे
रात्र सारी जागलो मी ,पावसात जेव्हा
जे गळाले छत घराचे कर्मभोग आहे
बेसुर बेताल सारे गीत मैफिलीचे
दुःख ना गीतात सार्या फोल राग आहे
कि विणावे मी कितीदा विस्कटून धागे
अर्थ ना नात्यात काही जिर्ण ताग आहे
पाजले मी दूध ज्याना अंगणात माझ्या
ते विषारी पाहिले मी घोर नाग आहे
प्राण बाकी आहे
संपलेलो आज नाही प्राण बाकी आहे
हारलेलो खास नाही प्रण बाकी आहे
संकटांच्या वादळानो मोडलो मी नाही निश्चयाचा त्यात मोठा त्राण बाकी आहे
सोडले मी जाहले जे खंत थोडी होती
शब्दबाणांचे तुमच्या त्या व्रण बाकी आहे
उत्तरे देणार साचे वेळ येता माझी
आत माझ्या सह्यतेचा बाण बाकी आहे
वाचुनीया ग्रंथ मोठे,ज्ञान कोणा झाले
अनुभवाचे फक्त येथे ज्ञान बाकी आहे
बाजी©
सवाल होते
जीवनास शोधले ना ,भोवती सवाल होते
एकटेच संगरी या,श्वासही हलाल होते
काय ही वरात माझी,चालली नको तिकडे
ऐकतेय कोण माझे, धुंद ते खुशाल होते
अंत पाहिला कधी मी ,हात दाखवून जेव्हा
सापडे न मृत्यु हाती, सर्व ची निहाल होते
सावलीत काय नाही, कोणतीच आज छाया
झाड वाळलेलं काही,अंग जे बकाल होते
फार पावसात होतो, झूकवून मान मी हा
लपवित अश्रु माझे,थेंब हे रुमाल होते
Sunday, 22 September 2019
श्लेष अलंकार
श्रुत्यैकयानेकार्थ प्रतिपादन श्लेषः (पण्डितराजकृत लक्षण)
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.
एक प्रयत्नौच्चार्यानाम् तच्छायाम् चैव विभ्रताम्
स्वरितादिगुणैर्भिन्नैबन्धः श्लिष्टमिहोच्यते (भट उद्भट)
अर्थात ,
एकाच प्रयत्नाने उच्चार करताना केवळ स्वर भिन्नतेमुळे एकमेकांची छाया असणार्या शब्दांच्या योजने मुळे श्लिष्ट अलंकार होतो
भामह आणी उद्भटाने श्लेष साठी श्लिष्ट हा शब्द वापरलेला
उदा :
सूर्य उगवला झाडीत...
झाडूवाली रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत...
अन् वाघहि तंगड्या झाडीत...
राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत" या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण
श्लेषालंकाराचे दोन मुख्य प्रकार
शब्द श्लेष आणी अर्थश्लेष
*शब्दश्लेष*
भिन्न उच्चार असणारे भिन्न अर्थ असणारे शब्द संधी मुळे किंवा एकसलग उच्चार करण्यामुळे सारखेच उच्चारले जातात तो शब्दश्लेष अलंकार होतो
शब्दश्लेष चे दोन प्रकार पडता
*अभंग श्लेष*
जेथे शब्द न तोडता म्हणजे एकच शब्द दोन अर्थाने वापरलेला असतो तेथे सभंग श्लेष अलंकार होतो
उदा,
१)मिञाच्या उदयाने सर्वांनाच आनंद होतो
२)हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.
या वाक्यामध्ये मिञ चाअर्थ दोस्त किंवा सुर्य आणी दुसर्या उदाहरणात
जीवन शब्दाऐवजी पाणी आणी आयुष्य यात एक शब्द दोन अर्थाने शब्द वापरण्यात आलेले म्हणून हा अभंग श्लेष होतो
*सभंग श्लेष*
सभंग श्लेष मध्ये भिन्न अर्थाचे शब्द केवळ उच्चारामुळे सारखे वाटतात
जसे कि
उदा :
श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी
यात वेगळ्या अर्थाचे दोन शब्द केवळ उच्चारामुळे सारखे वाटतात म्हणून येथे सभंग श्लेष अलंकार होतो .
कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तिळ यांस,
तरी तुम्हांस अर्पिली सु-मने
ते शीतलोपचारे जागी झाली ,हळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला, परिसुनि माता 'बरे' म्हणूनी डोले
हा शब्दश्लेष सभंग आणि अभंग असा द्विविध असून अर्थालंकारच असतो.” असे उद्भटानुयायी लोकांचें म्हणणें.
“हे दोन्हीही शब्दालंकारच; कारण यांच्यांत शब्द बदलतां येत नसल्यानें अन्वय व व्यतिरेक या प्रमाणांनीं येथील अर्थ शब्दावरच अवलंबून आहे, हें सिद्ध होतें. आतां श्लेषाचा तिसरा प्रकार मात्र अर्थालंकार मानला पाहिजे, कारण तो केवळ अर्थावरच अवलंबून आहे”
अर्थश्लेष
वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा :
तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच
या आर्येतील मलिन, कुटिल, नीरस जड हे शब्द बदलून त्याच अर्थाने दुसरे शब्द वापरले तरी श्लिष्ट नाहीसा होत नाही.
श्लेष अलंकारामध्ये श्लेष चमत्कृतीमुळे इतर अलंकारांची प्रतिभा उत्पन्न होते अशा ठिकाणी
श्लेष प्रधान व इतर अलंकार सहायक मानावा असे उद्भट सांगतो
संदर्भ,
भामहकृत काव्यालंकार ..देवेंद्रनाथ शर्मा
उद्भट कृत काव्यालंकार सारसंग्रह
अलंकार कौमुदी..परमेश्वरानंद
रसगंगाधर
अलंकार चंद्रिका ,गणेश गोरे
बाजी©®
omkarpandav.blogspot.com
Wednesday, 11 September 2019
अनुप्रास अलंकार आणी त्याचे उपप्रकार
अनुप्रास अलंकार
सरूपवर्णविन्यासमनुप्राप्त प्रचक्षते ।
किन्तया चिन्तया कान्ते नितान्तेति यथोदितम् |
अर्थात,
सारख्या वर्णांच्या (अक्षरांच्या)पुन्हा पुन्हा वापरास अनुप्रास म्हणतात
उदाहरणार्थ ,हे कान्ते तु त्या चिन्तेमुळे नितान्त (हिरमुसलेली) का आहेस अशा प्रकारे
अनुप्रास अलंकार तो असतो जेथे शब्द सारखेच असतात फक्त अर्थ वेगवेगळा असतो
*व्यंजन सम वरु स्वर असम अनुप्रास अलंकार*
म्हणजे ,अनुप्रासात फक्त व्यंजनांची समानता असावी स्वर मिळो वा ना मीळो
*अनुप्रास अलंकाराचे उपप्रकार*
*
अनुप्रास अलंकाराचे प्रामुख्याने पाच प्रकार पडतात
१)छेकानुप्रास
२)वृत्यानुप्रास
३)लाटानुप्रास
४)अन्त्यानुप्रवास
५)श्रुत्यानुप्रास
*छेकानुप्रास*-
एक किंवा अनेक वर्णांची(अक्षरांची) एकदाच आवृत्ती होते तेथे छेकानुप्रास अलंकार होतो
छेक म्हणजे वेिदग्ध मनुष्य , अशा मनुष्यांन ह अलंकार प्रिय असतो म्हणून त्याला हे नाव दिले आहे असे स्पष्टीकरण टीकाकारांनी केले आहे .
छेक म्हणजे घरट्यातच राहणारे पक्षी , त्याचा आवाज मधुर असतो म्हणून हे नाव दिले आहे असे दुसरेही एक स्पष्टीकरण इन्दुराजाने केले आहे .
ते फारसे पटण्यासारखे नाही .
रसाधनुगुणलेन प्रकृष्टो न्यास
( रसाला अनुरूप होईल अशी वर्णाची उत्कृष्ट योजना )
याप्रमाणे टीकाकारानी मम्मटाला अनुसरून अनुप्रास शब्दाची व्युत्पत्ती दिली आहे . .
छेकानुप्रासान निर्देश भामह , दडी व वामन याच्या ग्रथात नाही . तेव्हा त्याच्या विश्लेषणाचे व नामकरणाचे श्रेय उद्भटाला जाते
उदा. तु तुंग हिमालय अंग
अन मी
चंचल गति सुर सरिता
तु विमल हृदय उच्छवास
अन मी कान्त कामिनी कविता
यांत * ग,ता* यांचे प्रत्येकी एकवेळा आवृत्ती झालेली दिसेल
*वृत्यानुप्रास*: जेव्हा एकाच अक्षराची पुर्नआवृत्ती पद्यात अनेक वेळा होते तेथे वृत्यानुप्रास अलंकार होतो.
*
* उदाहरण -
* *चांदणे शिंपित जाशी चालता तु चंचले*
यात'च' या अक्षराची पुर्नआवृत्ती होते म्हणून हा वृत्यानुप्रास अलंकार होतौ
साजि चतुरंग बीररंग में तुरंग चढ़ि।
सरजा सिवाजी जंग जीतन चलत है॥
भूषन भनत नाद विहद नगारन के।
नदी नद मद गैबरन के रलत हैं॥
ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल,
गाजन की ठेल-पेल सैल उसलत हैं।
तारा सों तरनि घूरि धरा में लगत जिम,
धारा पर पारा पारावार ज्यों हलत हैं॥ --शिवराज भूषण
सजुन धजुन दिमाखदार अश्वारुढ सेना घेऊन सर्वशिरोमनी (सरेजाह)
शिवाजी युद्ध जिंकण्याकरिता निघालेला आहे
भुषण म्हणतो नगार्याचा अवाज मोठमोठ्याने होत आहे
मत्त हत्तींच्या मतिष्कातुन मदप्रवाह नदीसारखा वाहत आहे
रस्त्याने कोलाहल करित चाललेल्या सैन्यामुळे सगळीकडे खळबळ
माजलेली दिसते
महाकाय हत्तीदलापुढे पर्वत पर्वतासन देखील उखडले जात आहेत
शिवाजीच्या प्रबळ सेनेमुळे असमंतात उठलेल्या धुळीने सुर्य ही झाकला आहे
तसेच या प्रचंड सेनेच्या चालण्याने समुद्द देखील हलत आहेत
*लाटानुप्रास*
जेव्हा पद्यात शब्दाची किंवा वाक्यांची पुर्नआवृत्ती असते तेव्हा लट्टानुप्रास अलंकार असतो.
उदाहरण -
उंचे घोर मंदर के अंदर के रहन वारी
उंचे घोर मंदर के अंदर रहाती है
कंद मुल भोग करे कंद मुल भोग करे
तीनि बेर खाती सो तीनि बेर खाती है
भुषण सिथिल अंग भुषण सिथिल अंग
बिजन डुलाती तेब बिजन डुलाती है
भुषण भनत 'सिवराज'वीर तेरे त्रास
नगन जडाती ते नगन जडाती है
अर्थ
ज्या स्त्रिया पुर्वी महालांमध्ये राहत होत्या
त्या आता पर्वतांच्या गुफेत राहत आहेत
ज्या स्त्रिया पुर्वी मिष्टान्न खात त्याना आता
कंद मुळावर समाधान मानाव लागत आहे
ज्या तिन वेळ खात असत त्याना आता
तीन बोरे मिळणे ही महाग झालेले आहे
पुर्वि अभुषणांनी पुर्वी जे शरिर जड होत त्यांचे शरिर भुकेने शिथील झालेले आहे
ज्या पुर्वी भरपुर आप्तेष्ठांसोबत राहत त्याना आता वनवास प्राप्त झालेला
आहे भुषण म्हणतो हे शिवाजीराजा तु मिळविलेल्या शत्रुवरील विजयामुळे शत्रुस्रियांची इतकी वाईट अवस्था झालेली आहै कि त्या अंगवस्त्रासही महाग झालेल्या आहेत .
*या काव्यात शब्द सारखेच आहे परंतु अर्थ वेगळा असतो अशा ठिकाणी लाटानुप्रास होतो* जसे की
*श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न वरी*
*तो माणसासाठी मरण पावलेला माणूस आहे.*
अंत्यानुप्रास: पद्याच्या शेवटचे अक्षर म्हणजे तुकान्त जर सारखा असेल तर तेथे अंत्यानु प्रास अलंकार होतो
उदाहरण
नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी
अंत्यानुप्रासाचे इतर पाच उपप्रकारही आहेत
जसे की
१)सर्वान्त्यानुप्रास - जेथे सर्व पदाचे शेवटचे अक्षर सारखे असेल तेथे २)समान्त्यविषमान्त्यानुप्रास- जेथे पहील्या पदाचे आणी तीसर्या पदाचे शेवटचे अक्षर आणी दुसर्या व चौथ्या पदाचे शेवटचे अक्षर सारखे असेल तेथे
३)समान्त्यानुप्रास -जेथे फक्त दुसर्या आणी चौथ्या पदाचे शेवटचे अक्षर सारखे असेल तेथे
४)विषमान्त्यानुप्रास-जेथे फक्त पहीले आणी तिसरे पदाचे शेवटचे अक्षर सारखे असेल तेथे
५)समविषमान्त्यानुप्रास-जेथे पहीले ,दुसरे पदाचे शेवटचे अक्षर आणी तिसरे चौथे पदाचे शेवटचे अक्षर एक सारखे जुळत असेल तेथे
*श्रुत्यानुप्रास अलंकार*
जेव्हा एकाच वर्गातील शब्दांची पद्यात पुर्नआवृत्ती होते तेथे श्रुत्यानुप्रास अलंकार होतो (वर्ग जसे की ,तालव्य ,दंतव्य ,दंततालव्य,ओष्ठ्य इ)
उदा.धन्य जनम जगतितल तासु
पितही प्रमोद चरित सुनि जासु
येथे तालव्य दंत्य आणी ओष्ठव्य वर्गातील शब्दांची पुर्नआवृत्ती होते.
संदर्भ
भामहकृत काव्यालंकार ..देवेंद्रनाथ शर्मा
उद्भट कृत काव्यालंकार सारसंग्रह
अलंकार कौमुदी..परमेश्वरानंद
वामनकृत काव्यालंकारसुत्रवृत्ती...आचार्य विश्वेश्वर
मराठी विश्वकोश
बाजीराव पांडव©®
Tuesday, 10 September 2019
यमक अलंकार
यमक अलंकार आणी त्याचे उपप्रकार .
यमक
तुल्यश्रुतीनां भिन्नानामनिधैर्येः परस्परम् ।वर्णानां यः पुनर्वादो यमक तन्निगद्यते । । १७
अर्थात,
ऐकायला सारखैच परंतु वेगवेगळ्या अर्थाच्या शब्दांच्या
पुन्हा पुन्हा वापराने काव्यात जी नादमधुरता निर्माण होते तो यमक ...(काव्यालंकार)भामह
उदा. अरे रावणा राज्य गंभीर केले
सीते सारिखे रत्न चोरोनी नेले
या केले ,नेले हा यमक आहे .
*उपप्रकार*
यमकाचा काव्यात नेमका कोणत्या ठिकाणी
वापर केलेला आहे यावरुन उपप्रकार पडतात
यमकाचे उपप्रकार बरेच मानले जातात
परंतु भामहांनी पाचच मानले ते पुढीलप्रमाणे
१)आद्य यमक
२)मध्यान्त यमक (पुष्य यमक
३)पदाभ्यास (अन्त्य यमक)
४)आवली (पंक्ती वा शृंखला यमक)
५)समस्तपाद यमक(सर्वान्त्य यमक)
आद्य यमक-
प्रत्येक पदारंभी(चरणांरंभी ) वर्णांची पुर्नआवृत्ती होत असल्यास आद्य यमक होतो
उदा.
सजनी सजनी ले वसन,भूषन भूष न अंग
रजनी रज नीकी चली,अली अली लै संग
नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी
२)मध्यान्त्य यमक (पुष्य यमक)
पदांच्या मध्य स्थानी आणी शेवटी सारखीच शब्द आवृत्ती होत असेल तर मध्यान्त्य यमक होतो
उदा.
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.
३)पदाभ्यास (अंत्य यमक)
दोन वा तीन पदा शेवटी येणार्या यमकास अंत्य यमक म्हणतात .
उदा ,
मधुयामिनि नीललता
हो गगनीं सुमयुता
धवलित करि पवनपथा
कौमुदि मधुमंगला - १
दिव्य शांति चंद्रकरी
आंदोलत नीलसरी
गिरिगिरिवरि तरुतश्वरि
पसरी नव भूतिला - २
आवली (पंक्ती यमक)
कोणत्याही निश्चित स्थानी नसले तरी काव्यात वारंवार येऊन जे पदलालित्य निर्माण होते तो आवली(पंक्ती यमक) होतो
उदा
१)तालन पै ताल पै तमालन पै मालन पै
२)घनन् घनघोर चतुरंग भूप छत्रपती
खड्ग विखंडकारी म्लेंछ अरि छत्रपती
५) समस्त पाद यमक
सर्व चरणांती एकच यमक येत असेल तर तो सर्वान्त्य यमक होतो
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥
संदर्भ,
भामह कृत काव्यालंकार
भाष्यकार , देवेंद्रनाथ शर्मा
बाजीराव पांडव राक्षसभुवनकर ©
omkarpandav.blogspot.com
अलंकार
अलंकार
अलंकरोति इति अलंकारः
(जो भूषित करतो तो अलंकार)
* अलम अर्थात भूषण,
अलंकारान्ती पूर्व पिठीका -
संस्कृत काव्यशास्त्रात भामहा " चा
" काव्यलंकार " तसेच महाकवी दंडी कृत काव्यादर्श हे काव्यालंकार शास्त्राचे प्राचीन ग्रंथ ,
उभटाची भामहाने लिहीलेल्या काव्यालंकारवरील भाष्य टिका " काव्यालंकारसार संग्रह " भामहाचे अलंकार शास्त्राचे पूर्ण विवेचन करतो,तसेच उद्भटाचा समकालीन कवी वामन यांचा काव्यालंकारसूत्रवृत्ति हा ग्रंथ ही अलंकार शास्त्रावर महत्तम् भाष्य करतो .
भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचा आणि अलंकारशास्त्राचा उदय ही संस्कृत साहीत्य व कला क्षेत्रातील भारतीयांची त्याकाळी एक मोठी झोप होती .
*अलंकाराचे प्रकार*
अर्वाचीन अलंकार शास्त्रात प्रमुख तीन प्रकार मानले गेले ते पूढील प्रमाणे,
१)शब्दालंकार
२)अर्थालंकार
३)उभयालंकार
या व्यतिरीक्त अजून तीन ही सांगितले जातात
४)रसालंकार ५)भावालंकार ६)मिश्रालंकार
उद्भटाने ४४ अलंकार वृत्ती (स्वभाव)नुसार ६ वर्गात विभाजन केलेले आहे
तसेच विविध विद्वानांनुसार वृत्ती रसानुभवे विविध प्रकार केलेले
*शब्दालंकार *
काव्यात शब्द चमत्कृतीने अर्थात शब्दांच्या सुनियोजित वापराने जे श्रवणीय लालित्य उत्पन्न होते तो शब्द अलंकार असतो
हे विशिष्ट शब्दयोजनेवर आधारलेले असतात. त्यांचा अर्थाशी संबंध नसतो.
उदा., अनुप्रास आणि यमक हे शब्दालंकार आहेत. अनुप्रासात विशिष्ट वर्णांची पुनरावृत्ती केली जाते आणि ती साधण्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात. उदा., तांब्यांच्या पुढील ओळी:
कडकडा फोड नभ, उढव उडुमक्षिका
खडखडवी दिग्गजां, तुडव रविमालिका
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवी चहुंकडे या समुद्रा
या ओळींत ‘ड्’ या वर्णाची पुनरावृत्ती आहे.
शब्दालंकार हे
पुढील प्रमाणे सांगातले आहेत
१)यमक
२)अनुप्रास
३)श्लेष
४)वक्रोक्ती(अलंकार कौमुदीनुसार)
*अर्थालंकार*
अर्थावर अधिष्ठित असतात.
बहुसंख्य अलंकार अर्थांवरच आधारलेले आहेत.
एखाद्या अलंकाराचे एक वैशिष्ट्य ध्यानात घेऊन त्याला एका विशिष्ट वर्गात टाकले असता,
त्याच्या दुसऱ्या एखाद्या वैशिष्ट्यानुसार तो दुसऱ्या एखाद्या वर्गातही बसू शकेल,
असेही केव्हा केव्हा लक्षात येते.
अलंकारांचे रेखीव आणि सर्वस्वी बंदिस्त असे वर्गीकरण करणे यामुळे अत्यंत अवघड होऊन बसते. तथापि
अलंकारांच्या वर्गीकरणाचे एक उदाहरण म्हणून रुय्यकाच्या "अलंकार-सर्वस्व" या ग्रंथातील अलंकारांचे हेर्मान याकोबी यांनी दाखविलेले वर्गीकरण पाहण्यासारखे आहे. हे वर्गीकरण नऊ तत्त्वांवर करण्यात आले असून ती नऊ तत्त्वे व त्यांवर आधारलेले अर्थालंकार खालीलप्रमाणे आहेत.
(१) सादृश्य :
(अ) भेदाभेदतुल्यप्रधान :
(१) उपमा, (२) अनन्वय, (३) उपमेयोपमा, (४) स्मरण. (आ) अभेदप्रधान : आरोपगर्भ – (१) रूपक, (२) परिणाम, (३) संदेह, (४) भ्रांतिमान्, (५) उल्लेख, (६) अपन्हुती.
ब) अध्यवसायगर्भ – (१) उत्प्रेक्षा, (२) अतिशयोक्ती.
क)गम्यमानौपम्यमूलक – (१) तुल्ययोगिता, (२) दीपक,
(३) प्रतिवस्तूपमा, (४) दृष्टांत, (५) निदर्शना.
(ड) भेदप्रधान – (१) व्यतिरेक, (२) सहोक्ती, (३) विनोक्ती.
(२) गम्यत्व :
(१) समासोक्ती, (२) परिकर, (३) श्लेष, (४) अप्रस्तुतप्रशंसा, (५) अर्थांतरन्यास,
(६) पर्यायोक्त, (७) व्याजस्तुती, (८) आक्षेप.
(३) विरोध :
(१) विरोधाभास, (२) विभावना, (३) विशेषोक्ती, (४) अतिशयोक्ती, (५) असंगती,
(६) विषम, (७) सम, (८) विचित्र, (९) अधिक, (१०) अन्योन्य, (११) विशेष, (१२) व्याघात.
(४) शृंखलाबंधत्व :
(१) कारणमाला, (२) एकावली, (३) माला-दीपक, (४) उदार.
(५) तर्कन्यायमूलत्व :
(१) काव्यलिंग, (२) अनुमान.
(६) वाक्यन्यायमूलत्व :
(१) यथासंख्य, (२) पर्याय, (३) परिवृत्ती, (४) परिसंख्या, (५) अर्थापत्ती,
(६) विकल्प, (७) समुच्चय, (८) समाधी.
(७) लोकन्यायमूलत्व :
(१) प्रत्यनीक, (२) प्रतीप, (३) मीलित, (४) सामान्य, (५) तद्गुण,
(६) अतद्गुण, (७) उत्तर.
(८) गूढार्थप्रतीती :
(१) सूक्ष्म, (२) व्याजोक्ती, (३) वक्रोक्ती, (४) स्वभावोक्ती, (५) भाविक,(६) उदात्त.
(९) रसाश्रय : (१) रसवत्, (२) प्रेयान्, (३) ऊर्जस्वी, (४) समाहित, (५) भावोदय, (६) भावसंधी,
(७) भावशबल, (८) संसृष्टी, (९) संकर.
संदर्भ,
दण्डीकृत काव्यादर्श..व्रजरत्नदास प्रयाग
भामहकृत काव्यालंकार ..देवेंद्रनाथ शर्मा
उद्भट कृत काव्यालंकार सारसंग्रह
अलंकार कौमुदी..परमेश्वरानंद
वामनकृत काव्यालंकारसुत्रवृत्ती...आचार्य विश्वेश्वर
मराठी विश्वकोश
बाजी©
omkarpandav.blogspot.com
Sunday, 8 September 2019
मधुबाला
एक गंध नभी होता वाहत ,विचारले मी त्याला
केसात ताटवा कोण माळूनी , चालली वनमाला
वळून पाहता तिजला वारा, भारीच हो लाजला
कुंतली नभाचा प्रतिभास ,पाहता चंद्र ही हासला
कळी उमलता रास मोत्यांची,दृष्टीस ऐसी पडे
कळीभोवती दुधाळ हलके,कंज्ज केशरी सडे
गहीर्या गहीर्या डोळी पाहता,मन मोहरुन जाते
कोजागिरीच्या शशीवदनी या, जणू रजनी उतरते
रातराणी मजसाठी तु तर, सुंदर मोठे कोडे
सोबती रातीला नभी भोवती,दिवसा दृष्टीस पडे
लपंडाव तु खेळसी रमणी,रहस्य न उलगडे
तु नक्षत्र कि चांदणी रातीची, वा अप्सरा कळेना गडे
मनाला कुठे गुंतवत नाही
दुरापास्तसे काही मागत नाही
आता मनाला कुठे गुंतवत नाही
मनदोरीने पतंग उडवत राहतो
आभाळाला कवेत घेऊन उडतो
आभाळ घनांनी भरुन जेव्हा येते
वाट आसवां डोळ्यातून मी देतो
डोळ्यात आश्रु थांबत फार नाही
आता मनाला कुठे गुंतवत नाही
उगा कोणाचे भाव भावले होते
मानले कधी मी माझे ज्याना होते
शपथ अश्रुंची खरी वाटली होती
भेट अश्रुंनीच संपवलेली होती
कोणी सोडले काही हरकत नाही
आता मनाला कोठे गुंतवत नाही
का कोणावर हक्क असा सांगावा
का कोणावर जीव येथे उधळावा
का प्रेमाची भिक कुणा मागावी
का आशा ही कोणी परतेन धरावी
आशांवर जगतो तो मी भणंग नाही
आता मनाला कुठे गुंतवत नाही
बाजी©
Tuesday, 3 September 2019
आयुष्य नावाच्या राज्यात
कोणाला दैव देते ,कोणाचे दैव नेते
इथे काही कर्माने,स्वतःचे दैव निर्माण करतात
काही दैवाने दिलेले,कर्माने गमावितात
आयुष्य नावाच्या राज्यात बुद्धी राजा आणी मन राणी असते, विचार प्रधान आणी नीती म्हणजे मंत्री असतात
यात कोणी नीतीमुल्यांच्या आणी विचारांच्या सल्ल्याने वागून कर्तुत्ववान होतात तर काही मन रुपी चंचल राणीच्या आहारी जाऊन , राज्याच्या शरीर नामक सिंहासनाचा अनिर्बंध वापर करुन आयुष्याची माती करुन घेतात .
सर्वानाच सगळं काही मिळत नसते इथे प्रत्येक गोष्ट कर्तुत्वाने मिळवायची असते ,धैर्य नावाचा सैनापती आणी जिद्दीच सैन्य त्यामागे उभं करावं लागते , प्रयासाने आणी धैर्याने
आयुष्यात हारजीत पचवून राज्य राखावे आणी वाढवावे लागते,कठीण काळाच्या भट्टीतूनच बलशाली राष्ट्र आणी चरित्रे निर्माण होत असतात हे खरे.
आपल्याच राज्यात अनेक गुणरत्नांच्या खाणी दडलेल्या असतात ,प्रयास आणी अभ्यास पुर्व त्या शोधून ,खोदून काढाव्या लागतात .त्या गुणरत्नाना प्रयत्नांचे पैलु पाडून जगासमोर त्यांची चमक दाखवावी लागते ,ती त्यांच्या नजरेत आणून द्यावे लागते .
चमकत नाही तोवर सोनेतरी कुठे मातीमध्ये ओळखु येते नाही का !
बाजी राधाकृष्ण
omkarpandav.blogspot.com
insta id. https://www.instagram.com/p/B18UrCBlOvh/?igshid=r1p3owncl40z
Saturday, 31 August 2019
भुषण छंद पद्यानुवाद
एक कहै कलपदुम है इमिं पूरत है सबकी चित चाहै ।
एक कहैं अवतार मनोज को यों तन मै अति सुंदरता है ।
भूषन एक कहैं महि इंदु यो राज बिराजत बाढयो महा है ।
एक कहैं नरसिंह है संगर एक कहैं नरासिंह सिवा है ॥ १
*पद्यानुवाद*
हा जणु कल्पलता शिव राजन सर्व करी जनकामन पुर्ती
तो अवतारच श्रीहरि चा मन भावन मोहक सुंदर मुर्ती
चंद्रच तो जणु काय कलानुरुपे वर कायम वाढत जातो
हा शिव मारत शत्रु रणी मग जो वधुनी नर सिंहच होतो
२) प्रेतिनी पिसाचरु निसाचर निसाचरी हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है
भैरों भूतप्रेत भूरि भूधर भयंकर से , जुत्थ जुत्थ जांगिनी जमाति जुरि आई है
किलकि किलकि के कुतूहल करति काली ,डिम डिम डमरू दिगंबर बजाई है
सिवा पूछें ' समाजु आजु कहाँ चली, काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है । । ३ । ।
हडळी अन निशाचर पिशाच पिशाची ही ,
पुन्हा पुन्हा आनंदाने गातं गर्जत आहे
भैरव भुतप्रेत हे बलवान महाकाय,
झुंडी झुंडी सागरासम ही जमतं आहे
किल किल किल किल गर्जते कालिभवानी,
डम डम डमरु हे रुद्र वाजवताहे
गिरीजा विचारे देवा गणसेना चाले कोठे,
म्हणे शिवराय भृकुटी चढवताहे
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
आरे प्रसाद आरे प्रसाद! तु विनुला पाहीलस का रे ? हापाहापत्या स्वारात रवी विचारत होता! आत्ताच तर इथ होता ! कुठे गेला कुणास ठाऊक ! खांदे उड...
-
सोडलास हात जेवा गेलीस निघुन अशी बोलवलं ही असत परत पण वाटलं वेळ गेली होती रंगलो होतो सुखस्वप्नात बागडत होतो स्व छंदात मोडुन सुखाची झोप ...
-
श्रुत्यैकयानेकार्थ प्रतिपादन श्लेषः (पण्डितराजकृत लक्षण) एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अ...